मागील वर्षीच्या दुबई ट्रिप नंतर या वर्षी कुठे फिरायला जायचे यावर बराच विचार झाला. दुबईनंतर कंबोडिया, भूटान यांवर चर्चा झाली पण काही लोकांनी पाहिले असल्यामुळे विषय मागे पडला. मागच्या वेळी मानवनिर्मित चमत्कार बघितले, त्यामुळे यावेळी नैसर्गीक ठिकाण पाहावे असेही एक मत होते. त्यामुळे अंदमान, मालदीव,भूतान यावर चर्चा झाली आणि अखेरीस बऱ्याच ठिकाणांचा विचार करून श्रीलंका ठिकाण नक्की झाले.
श्रीलंका या देशाविषयी क्रिकेट, रावण आणि LTTE या व्यतिरिक्त काहीही माहीत नव्हते, तसेच श्रीलंकेमधील कोणत्याही प्रसिद्ध ठिकाणाविषयी माहिती नव्हती. त्यामुळे प्रथम श्रीलंकेतील प्रसिद्ध ठिकाणांबद्दल इंटरनेट वरून माहिती काढली. एका रविवारी मागच्या ट्रीपच्या संपूर्ण टीम यांना पण भेटून आलो. या वेळी आपणच संपूर्ण ट्रिप प्लॅन करावी असे वाटत होते आणि त्याचाच एक भाग म्हणुन मित्रांशी संपर्क केला आणि त्यांनी सुचवलेली ठिकाणे आणि आम्ही इंटरनेट वरून पाहीलेली ठिकाणे यांचा अभ्यास करून अंतिम ठिकाणांची यादी निश्चित केली. हॉटेलचे बुकींग एजंट कडून घेतले आणि विमानाचे बुकिंग आम्हीच केले. या सर्व खटाटोपामुळे ट्रिप ची किंमत खूप कमी झाली आणि स्वतः ट्रिप ठरवल्याचे समाधान पण मिळाले. या वेळी आम्ही एकंदरीत १७ जणांचा ग्रूप तयार झाला. आणि नागपूर विमानतळावरून पहाटे चार वाजता आमचा प्रवास सुरू झाला. श्रीलंका विमानतळा एअरपोर्ट वरील सर्व सोपस्कार पूर्ण करून बाहेर आलो. बाहेर ट्रिपचा guide वाटच पाहात होता. दुपारची वेळ होती आणि जायचे ठिकाण जास्त लांब नसल्यामुळे एअरपोर्ट वर थोडा आराम करून निघायचे ठरले. दुपारीच कॅंडी कडे जायला सुरुवात केली. दुपारी साधारण २ ला कॅंडी मध्ये पोहचलो. एका चांगल्या हॉटेल मध्ये नाश्ता केला आणि ट्रिपचे पहिले ठिकाण म्हणजे बोटॅनिकल गार्डन बघायला निघालो. Temple ऑफ tooth हे एक बुद्धांचे एक सुंदर मंदिर आहे. गौतम बुद्धाचा एक दात इथे जतन करून ठेवला आहे. तो एका पेटीत कायम बंद असतो आणि तो दर्शनाला ठेवत नाही. तो दर्शनाला कायम ठेवला तर कॅंडी मध्ये खूप पाऊस पडून नुकसान होते अशी लोकांची भावना आहे, म्हणून ५ वर्षातून एकदा लोकांना दर्शनासाठी ठेवला जातो. पूर्वी हे मंदिर म्हणजे श्रीलंकेच्या शेवटच्या राजाचा महाल होता, नंतर त्याला मंदिरामध्ये बदलण्यात आले. राजवाडा आणि मंदिर एकदम छान होते. १ तास इथे घालवल्यानंतर आम्ही आमच्या पहिल्या हॉटेल हिलटॉप मध्ये दाखल झालो
जेवण आणि थोड्या वेळ आराम केल्यावर ‘Cultural show’ बघायला बाहेर पडलो. श्रीलंकन संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम चांगला होता. कार्यक्रम संपल्यावर हॉटेलवर येऊन आराम केला. सहलीचा दुसरा दिवस आज सकाळी आम्ही तयार होऊन प्रथम ‘Elephant Orphanage’ म्हणजेच हत्तीचे अनाथालय बघायला गेलो. तिथे बरेच हत्ती पाहिले, नंतर लहान मुलांनी हत्तींना फळे खाऊ घातली. ठिकाण तसे ठीकठीक होते. त्यानंतर दंबुल्ला लेण्या (Dambulla Caves) बघायला गेलो.
Dambulla Caves ह्या लेण्या कॅंडी शहरापासून ७२ किलोमीटर आहे . सर्व लेण्या एका खडकामध्ये कोरल्या आहेत. एकूण ८० गुहा आहेत पण त्यापैकी फक्त ५ गुहा सध्या चांगल्या स्थितीत आहेत. या गुहांमध्ये गौतम बुद्धांच्या एकूण १५३ मूर्ती आणि चित्रे आहेत तसेच काही ठिकाणी स्थानिक राजा आणि हिंदू देवतांच्या मूर्ती सुद्धा आढळतात. मूर्त्या आणि चित्रे खूप सुंदर आहे. ह्या लेण्या एक पुरातन स्थळ (Heritage site) म्हणून घोषित करण्यात आले आहे. सिगिरिया या जागेला सिगिरिया\ सिंहगिरी \ lion rock अशी नावे आहेत.
ही एक पुरातन आणि ऐतिहासिक वास्तू आहे. वस्तुतः हा एक खूप मोठा आणि उंच खडक आहे जिथे कश्यप नावाच्या राजाने महाल बांधला होता अशी कथा आहे. हा रावणाचा महाल होता अशी पण एक आख्याईका आहे. हे ठिकाण युनेस्कोने पुरातन स्थळ म्हणून घोषित केले आहे. वर चढायला छोट्या पायऱ्या आहेत आणि चढण तीव्र आहे. मध्यवर्ती भागात एका गुहेत पुरातन चित्रे आढळतात. तिथून वर गेल्यावर मोराची पावले वाटतील अशी रचना आहे आणि तिथून राजवाडा परिसर चालू होतो. वर गेल्यावर राजाचा दरबार आणि इतर व्यवस्था बघता येते. वरून हिरव्यागार जंगलाचे विहंगम दृष्य दिसते. चुकवू नये असे हे ठिकाण आहे पण पायऱ्या चढायची मानसिक तयारी करून जावे.
आजचा दिवस खूप थकवणारा होता पण आज चांगल्या ठिकाणांना भेट दिल्याचे समाधान होते. सहलीचा तीसरा दिवस आजचे पहिले ठिकाण होते ‘Spice and Herbal Garden’ ही बाग काही एकरामध्ये पसरली आहे. इथे बऱ्याच आयुर्वेदिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. एकदा पाहण्यासारखे ठिकाण आहे. तिथून nuwara eliya इथे जाण्यासाठी निघालो. वाटेमध्ये एके सुंदर हनुमान मंदिर आहे जे एका डोंगरावर बांधले आहे. चिन्मय मिशन संस्थेने हे मंदिर २० वर्षांपूर्वी बांधले. मंदिर अतिशय सुंदर आहे आणि तेथुन दिसणारा निसर्ग अप्रतिम आहे. तेथील एका हॉटेल मध्ये जेवण करून पुढे निघालो. पुढे रस्त्यात ‘रामबोडा’ धबधबा लागला.
पुढे एका चहाच्या फॅक्टरीला भेट दिली. तिथे पानांपासून चहाची पावडर बनवण्याची पूर्ण पद्धत सांगण्यात आली. ही फॅक्टरी आणि आजूबाजूचे चहाचे मळे उटीची आठवण देत होते. या परिसरातून जाताना सर्वत्र चहाचे मळे दिसत होते, काही ठिकाणी थांबून फोटो काढून घेतले. थोडा वेळ चहाच्या मळ्यातून प्रवास करून ‘Nuwara Eliya’ इथे पोचलो. Nuwara Eliya हे डोंगरांमध्ये वसलेले छोटे शहर आहे. याला little england असेही म्हणतात. वातावरण अतीशय आल्हाददायक होते. अतिशय योग्य पद्धतीने वसवलेले शहर आहे असे फिरताना लगेच लक्षात येते. इथे ब्रिटिशांनी बांधलेल्या बऱ्याच वास्तू दिसतात आणि ब्रिटिशांच्या अस्तित्वाच्या खुणा दिसतात. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे एक निवासस्थान आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात ‘व्हिक्टोरिया पार्क’ नावाची सुंदर बाग आहे, तिथे संध्याकाळी भेट दीली. बाग २७ एकर परिसरामध्ये पसरली असून अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे . वेगवेगळ्या पद्धतीची फुलझाडे येथे दिसतात. बर्याच वेळ येथे भटकंती केल्यानंतर आम्ही रात्री उशिरा हॉटेलवर पोचलो. सहलीचा चौथा दिवस आज सकाळी ८:०० ला हॉटेल सोडले. nuwara elliya शहराच्या मध्यभागी एक सुंदर आणि मोठा तलाव आहे तो म्हणजे ‘Gregory Lake’, त्या तलावामध्ये सकाळी बोटींग केले. तलाव आणि आजूबाजूचा परिसर सुंदर होता, युरोप मधील एखाद्या टुमदार गावामध्ये आहे असे वाटून गेले. तेथून आम्ही थेट जंगल सफारी साठी आमच्या पुढच्या ठिकाणी म्हणजे ‘Udawalawe National Park’ साठी रवाना झालो. प्रवास एकूण ४ तासांचा होता.
वाटेमध्ये एके ठिकाणी मोठा धबधबा लागला, तेथे १०-१५ मिनिटे थांबलो होतो. रावण तिथे आंघोळीला यायचा अशी एक आख्याईका सांगण्यात आली. दुपारी साधारण ३:३० ला हॉटेलला पोहचलो. सामान हॉटेल टाकून सफारीसाठी रवाना झालो. Udawalawe National Park जंगल सफारीसाठी आम्हाला २ स्वतंत्र जीप देण्यात आल्या होत्या. सफारी चालू होण्यापूर्वी सर्वप्रथम हत्तीने दर्शन देऊन जणू आमचे स्वागत केले. जंगल मोठे आणि घनदाट होते. जंगल सफारीचा माझा पहिलाच अनुभव होता. सफारीदरम्यान मोर, मगर, ससे, वेगवेगळ्या प्रकारची हरणे, मगर द्रुष्टीस पडले. पक्षांमध्ये २-३ प्रकारचे गरुड, खंड्या दिसले. आमच्या २ जीप पैकी एका जीप मधील लोकांना चित्ता दिसला. आमची जीप तिथं पोहचे पर्यंत तो जंगलात गायब झाला. नंतर बराच वेळ वाट पाहिली पण चित्ता काही दिसला नाही. २-३ तास सफर करून हॉटेलवर परतलो.
सहलीचा पाचवा दिवस आज सकाळी आवरून आमच्या पुढच्या ठिकाण म्हणजे bentotaa साठी रवाना झालो. साधारण ३-४ तासांच्या प्रवासानंतर आम्ही बेंटोटा जवळ पोचलो. आमचे पहिले ठिकाण होते मदू नदीमध्ये बोट ride.
Madu river boat ride : मदू गंगा ही श्रीलंकेमधील एक मोठी नदी आहे. तिच्यामध्ये एकूण ६० बेटे आहेत. आम्हाला life jacket देऊन बोटीमध्ये बसवण्यात आले. या ride साठी जाताना टोपी आणि goggle जवळ ठेवणे नेहमी चांगले. काही बोटींना ताडपत्री असते पण ती ride च्या वेळी अडसर ठरते म्हणून काढून टाकतात. नदीचे पात्र खूप विशाल आहे आणि कडेला घनदाट वृक्ष आणि त्यांची आक्राळ-विक्राळ मुळे (Mangroes) दिसतात. बऱ्याच ठिकाणी वृक्षांमधून जाणारे बोगदे खूप सुंदर दिसतात. २-३ वेळा आम्ही अश्या बोगद्यांमधून गेलो. येथील लोकांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे त्यामुळे नदीमध्ये बऱ्याच ठिकाणी एका वेगळ्या प्रकारची बांबूने तयार केलेली जाळी दिसतात. थोड्या वेळ बोटीने प्रवास केल्यानंतर बोट एका बेटावर थांबली. त्या बेटावर दालचिनी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. तेथील स्थानिक महिलेने खोडापासून दालचिनी काढायचे प्रात्यक्षिक दाखवले.
तिथून आमची बोट एका दुसर्या ठिकाणी नेली जिथे Fish Farming होते. इथे एका छोट्या पाण्याच्या कुंडात भरपूर छोट्या आकाराचे मासे सोडले जातात आणि पर्यटकांना त्यामध्ये पाय सोडून बसायची परवानगी देतात. पाय सोडल्यावर छोटे मासे पायापाशी जमा होऊन चावण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे खूप मजा येते. मासे छोटे असल्यामुळे त्यांचे दात लागत नाही तर गुदगुल्या होतात. हा एक चांगला अनुभव होता. पूर्ण नदीची सफर २-२.५ तास चालली.
२-३ तास बोटीतून सफर केल्यावर जेवण करून आम्ही पुढच्या ठिकाणी रवाना झालो. पुढचे ठिकाण होते Turtle Hatchery म्हणजेच कासव संगोपन केंद्र. Turtle Hatchery कासवाची मादी समुद्र किनाऱ्यावर येऊन अंडी देते आणि ती जमिनीमध्ये लपवून ठेवते. काही दिवसानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात आणि ती समुद्रात जातात, पण काही पक्षी, खेकडे आणि इतर प्राणी ती लहान पिल्ले समुद्रात जाण्याआधी खाऊन टाकतात. त्यामुळे कासवांची संख्या खूप घटली आहे म्हणून त्यांचे रक्षण करण्यासाठी या केंद्रातील लोकं विशेष प्रयत्न करतात. या केंद्रामध्ये अंडी जपून ठेवतात. अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना २ महिने केंद्रातच वाढवले जाते आणि मग समुद्रामध्ये सोडले जाते. या केंद्रात इतर अनेक वेगवेगळ्या आकाराची कासवे पर्यटकांसाठी ठेवली आहे. एक कासव तर १०० वर्ष वयाचे आणि २२५ किलोचे होते. लहान मुलांनी इथे खूप धमाल केली. इथून वॉटर स्पोर्ट्स साठी एका ठिकाणी थांबलो. मुलांनी इथे banana ride केली. बाकी विशेष काही नव्हते. तिथून निघून हॉटेलवर पोहचलो. हॉटेलच्या मागे समुद्र किनारा होता, तिथे संध्याकाळी फिरायला गेलो.
सहलीचा सहावा दिवस आजचा दिवस निवांत होता. आज सकाळी सगळे समुद्रावर खेळायला गेलो होतो.. सगळ्या मुलांनी आणि काही मोठ्यांनी समुद्रात पोहणाच्या आनंद घेतला. हॉटेलची जागा खूप छान होती. सकाळी नाश्ता झाल्यानंतर आम्ही समुद्रकिनारी भरपूर फोटो काढले.सकाळी १० वाजता आमचे शेवटचे ठिकाण कोलंबो येथे रवाना झालो. कोलंबो तिथून ३२ कि. मी. होते.
कोलंबो हे शहर श्रीलंकेचे महत्वाचे शहर आहे. कोलंबो ला पोचल्यानंतर आम्ही शहराची सफर केली. टूर गाईडने शहराची चांगली माहिती दिली. फिरताना आम्ही वेगवेगळी ५-स्टार हॉटेल्स, काही महत्वाच्या सरकारी इमारती, बँकांची मुख्य कार्यालये पाहीली. पंतप्रधान आणि राष्ट्रपती निवास सुद्धा बघितले. एकंदरीत एखाद्या मुख्य राजधानीच्या शहरासारखे हे पण शहर होते. चीन येथे खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे आणि आपल्या व्यापाराचा मोठ्या प्रमाणात विस्तार करत आहे ही गोष्ट प्रामुख्याने जाणवली. सफर पूर्ण झाल्यानंतर हॉटेल वर पोचलो. आज संध्याकाळी बराच निवांत वेळ होता. सहलीचा आजचा आमचा श्रीलंकेतला शेवटचा दिवस. सकाळी सामान भरून हॉटेल सोडले. एका ठिकाणी शॉपिंग केले. बर्याच चांगल्या भेट वस्तू मिळाल्या. दुपारचे जेवण करून एअरपोर्टला रवाना झालो.
संध्याकाळचे विमान पकडून चेन्नईला आलो आणि चेन्नईहून नागपूरला ११ वाजता घरी पोचलो.
श्रीलंका फिरताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली आणि ती म्हणजे सगळ्या ठिकाणी दिसलेली हिरवाई. तसेच भेट दिलेल्या सर्व ठिकाणी कमालीची स्वच्छता दिसली. लोकांची गर्दी आणि विक्रेत्यांचा त्रास सुद्धा कुठेही जाणवला नाही. तिथली जवळजवळ सगळी वाहने भारतीय कंपन्यांची आहेत. सगळ्या वस्तूंमध्ये भारतीय कंपन्यांनी केलेला शिरकाव लक्षात येण्यासारखा आहे. कोलंबो शहरामधील वाहतुकीची शिस्त हा सुद्धा एक सुखद धक्का होता.
अशाप्रकारे एकूण ७ दिवसाच्या आमच्या ट्रिप मध्ये सगळ्या प्रकारच्या निसर्गाचा आस्वाद, बर्याच चांगल्या आठवणी आणि अनुभव घेऊन आमची श्रीलंका ट्रिप सुफळ संपूर्ण झाली.
Ganesh Bhusari ( Travel Guru )
Travel Lover & Blogger
No comments:
Post a Comment